नवी दिल्ली Cricket World Cup 2023 :टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयनं राहुलची विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. राहुलला उपकर्णधार बनवण्याची माहिती अद्याप बीसीसीआय किंवा आयसीसीकडून अधिकृतपणे देण्यात आलेली नाही, मात्र बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्यानं याची पुष्टी झाली आहे.
हार्दिकच्या जागी उपकर्णधार बनला : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर झाला. त्यानंतर त्याच्या जागी राहुलची उपकर्णधार पदी नियुक्ती करण्यात आली. पुण्यात बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती. यानंतर त्यानं सामना अर्धवट सोडला. हार्दिक उपचारासाठी बेंगळुरूच्या एनसीएमध्ये गेला होता. त्यानंतर बातमी आली की, काही सामन्यांनंतर हार्दिक टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकतो. मात्र आज बीसीसीआयनं अधिकृतपणे सांगितलं की, हार्दिक विश्वचषक २०२३ मधून बाहेर पडला आहे.
राहुलला कर्णधारपदाचा अनुभव : हार्दिक संघाबाहेर झाल्यानंतर केएल राहुलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं. राहुल यापूर्वीही संघाचा उपकर्णधार होता. याशिवाय राहुलला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपदाचाही अनुभव आहे. राहुलनं ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केले असून यापैकी ६ सामन्यात संघाला विजय मिळाला आहे. तर ३ सामन्यात भारताला हार पत्कारावी लागली.
आयपीएलमध्येही नेतृत्व केलंय : याशिवाय राहुलला आयपीएलमध्येही कर्णधारपदाचा मोठा अनुभव आहे. तो सध्या लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असून यापूर्वी त्यानं पंजाब किग्जचं कर्णधारपद हाताळलं आहे. राहुल आता रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात उपकर्णधार म्हणून खेळेल. कोलकात्याच्या ईडन गार्डन येथे होणाऱ्या या सामन्यात राहुल प्रथमच विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून खेळताना दिसेल.
हेही वाचा :
- Mohammed Shami : वडीलच होते पहिले प्रशिक्षक, शेतामध्ये शिकला स्विंग बॉलिंग; जाणून घ्या शमीचा आतापर्यंतचा प्रवास
- Cricket World Cup 2023 : दुखापतग्रस्त हार्दिकला विश्वचषकातून निरोप; हा 'प्रसिद्ध' खेळाडू घेणार जागा