बंगळुरू Cricket world cup 2023 IND vs NED : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील शेवटचा साखळी सामना रविवारी भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात एक विलक्षण नजारा पाहायला मिळाला. जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्मानं प्रेक्षकांची मागणी पूर्ण केली. खरं तर गेल्या अनेक सामन्यांपासून प्रेक्षक रोहित शर्माला विराट कोहलीला गोलंदाजी देण्याची मागणी करत होते. प्रेक्षकांनी नेदरलँडविरुद्ध अशी मागणी करायला सुरुवात केली तेव्हा रोहितनं प्रेक्षकांची मागणी पूर्ण करत विराटला गोलंदाजी दिली.
गोलंदाजीत नऊ वर्षांनंतर घेतली एक विकेट : प्रेक्षकांच्या मागणीनुसार भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली गोलंदाजी करायला आला. इतकंच नाही तर दुसऱ्या षटकात त्यानं एक विकेटही घेतली. यानंतर कोहलीचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. कोहलीनं विकेट घेताच अनुष्का शर्मानंही जल्लोष केला. कोहलीनंतर प्रेक्षकांनी रोहित शर्माला शुभमन गिलला गोलंदाजी देण्याची मागणी सुरू केली. यानंतर शुभमन गिलदेखील गोलंदाजीसाठी आला. त्यानं दोन षटकं गोलंदाजी केली. इतकंच नाही तर त्यानंतर सूर्य कुमार यादवनंही गोलंदाजीत हात आजमावला आणि 2 षटकं टाकली. मात्र, दुसऱ्याच षटकात त्याला लागोपाठ दोन षटकार खावे सागले. प्रेक्षक इथंच थांबले नाहीत ते रोहितकडेही गोलंदाजीची मागणी करू लागले. मग प्रेक्षकांच्या मागणीनुसार कर्णधार रोहित शर्माही शेवटच्या विकेटसाठी गोलंदाजी करायला आला. त्यानं नेदरलँडची शेवटची विकेट काढून संघाला विजयाकडं नेलं.