लखनऊ Cricket World Cup २०२३ : टीम इंडिया आपला पुढील सामना लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. लखनऊमधील एकना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. अशा स्थितीत, या सामन्यात भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो.
जडेजा आणि कुलदीपचं स्थान पक्कं :भारताच्या प्लेइंग ११ मध्ये सध्या रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचं स्थान पक्कं आहे. भारताच्या १५ सदस्यीय संघात रविचंद्रन अश्विन हा तिसरा फिरकीपटू आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडविरुद्ध लखनऊच्या टर्निंग ट्रॅकवर अश्विनचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करू शकतात.
वेगवान गोलंदाजाला वगळणं शक्य नाही : जर रविचंद्रन अश्विनला भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजांपैकी कोणाला एकाला तरी वगळावं लागेल. जसप्रीत बुमराह हा संघाचा मुख्य गोलंदाज आहे. त्यामुळे त्याला वगळलं जाणार नाही. सिराजनंही स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. तर मोहम्मद शमीनं न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात ५ बळी घेतले होते. अशा स्थितीत त्याला संघातून बाहेर काढणं कठीण जाईल.