अहमदाबाद Cricket World Cup २०२३ : टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. यासह तो आता विश्वचषक २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. बुमराहनं पाकिस्तानविरुद्ध ७ षटकांत १९ धावा देत २ बळी घेतले. याआधी त्यानं अफगाणिस्तानविरुद्ध ४ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ बळी घेतले होते.
गोलंदाजीत बुमराह पहिल्या स्थानी : बुमराहच्या नावे या विश्वचषकाच्या ३ सामन्यात ८ विकेट्स आहेत. बुमराहशिवाय न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री हे देखील प्रत्येकी ८ विकेट्स घेऊन दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. मात्र उत्कृष्ट सरासरी आणि इकॉनॉमीमुळे बुमराह पहिलं स्थान पटकावलं. या विश्वचषकात जसप्रीत बुमराहनं केवळ ३.४४ ची इकॉनॉमी आणि ११.६२ च्या सरासरीनं धावा दिल्या आहेत.
रोहित शर्मानं मोडला आणखी एक रेकॉर्ड : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं पाकिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी करत दमदार अर्धशतक झळकावलं. रोहित शर्मानं ३६ चेंडूंचा सामना १३३.३३ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटनं ५० धावा पूर्ण केल्या. रोहित ६३ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीनं ८६ धावा करून बाद झाला. या सामन्यात रोहित शर्मानं एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. आता रोहित वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील तिसरा फलंदाज बनला आहे. यासह तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज आहे. रोहित शर्माच्या नावे वनडेमध्ये ३०० षटकारांची नोंद झाली आहे. भारताच्या डावातील ९ व्या षटकात त्यानं पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफला दोन षटकार मारून वनडेत ३०० षटकार पूर्ण केले.