मुंबई Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर धावांनी शानदार विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित ५० षटकात ४ गडी गमावून ३९७ धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकात सर्वबाद ३२७ धावाच करू शकला.
टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक : या विजयासह भारतानं रविवारी (१९ नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली. आता अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एकाशी होईल. या दोन संघांमधील दुसरा उपांत्य सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर होणार आहे.
भारताची प्रथम फलंदाजी : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात धमाकेदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी ७१ धावांची सलामी दिली. रोहितचं या विश्वचषकातील आक्रमक रूप आजच्या सामन्यातही दिसलं. घरच्या मैदानावर खेळताना तो केवळ २९ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. शुभमन गिलनही अर्धशतक साजरं केलं. तो ६६ चेंडूत ८० धावा करून परतला.
विराट कोहलीचं ५०वं वनडे शतक : हे दोघं बाद झाल्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कोहली-अय्यरनं सामन्याची सूत्रं आपल्या हाती घेतली. या दोघांनीही मैदानावर चौफेर फटकेबाजी करत स्कोरबोर्ड सतत हलता ठेवला. विराट कोहलीनं वनडेमधलं त्याचं ५०वं शतक झळकावलं. या विश्वचषकातलं हे त्याचं तिसरं शतक आहे. तो ११३ चेंडूत ११७ धावा करून परतला.
श्रेयस अय्यरची तुफान फटकेबाजी : तो बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरनं राहुलसोबत मिळून तुफान फलंदाजी सुरू केली. अय्यरनं केवळ ६७ चेंडूत शतक ठोकलं. भारताकडून विश्वचषकातील हे सर्वात वेगवान शतक आहे. तो केवळ ७० चेंडूत १०५ धावांवर बाद झाला. राहुल २० चेंडूत ३९ धावा ठोकून नाबाद राहिला. अशाप्रकारे भारतानं निर्धारित ५० षटकात ४ गडी गमावून ३९७ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टीम साऊदीनं १०० धावा देऊन ३ बळी घेतले.
विल्यमसन-मिशेलची भागिदारी : धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात अडखळत झाली. डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र हे फार्मात असलेले दोन्ही सलामीवीर प्रत्येकी १३ धावा करून बाद झाले. मात्र त्यानंतर कर्णधार विल्यमसन आणि डॅरिल मिशेलनं पडझड रोखली. या दोघांनी १५० धावांची भागिदारी रचत भारताला अडचणीत आणलं. मात्र शामीनं विल्यमसला सूर्यकुमारच्या हाती झेलबाद करत कमबॅक केला. तो ७३ चेंडूत ६९ धावा करून बाद झाला.
शमीचा भेदक मारा : दुसऱ्या टोकानं डॅरिल मिशेलनं एकहाती किल्ला लढवून ठेवला. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. मिशेलनं ११९ चेंडूत १३४ धावा केल्या. त्यालाही शामीनं बाद केलं. ग्लेन फिलिप्सनं ३३ चेंडूत ४१ धावांचं योगदान दिलं. हे दोघं बाद झाल्यानंतर भारतानं न्यूझीलंडचे उरले-सुरले फलंदाज झटपट बाद केले. भारताकडून मोहम्मद शमीनं अत्यंत भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. त्यानं ५७ धावा देत न्यूझीलंडचे ७ गडी तंबूत परत पाठवले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
- न्यूझीलंड :डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
हेही वाचा :
- Ind vs NZ Semifinal : आयसीसीमधील न्यूझीलंडच्या वर्चस्वाला धक्का देण्याकरिता भारतीय संघ आज उतरणार मैदानात
- Cricket World Cup 2023 : विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यासाठी वानखेडे सज्ज, असा असणार पोलीस बंदोबस्त
- Cricket World Cup 2023 : पुन्हा एकदा दिसणार भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्याचा थरार! टीम इंडिया मँचेस्टरचा बदला मुंबईत घेणार का?