हैदराबाद Cricket World Cup 2023 : इंग्लंडमध्ये २०१९ क्रिकेट विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मँचेस्टरमध्ये खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे २ दिवस चाललेल्या या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला अवघ्या २३९ धावांवर रोखलं. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ २२१ धावांवर गडगडला आणि भारतानं १८ धावांनी सामना गमावला. अशाप्रकारे विश्वचषक जिंकण्याचं भारताचं स्वप्न धुळीला मिळालं. चार वर्षांनंतर आता हे दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आमनेसामने आहेत. १५ नोव्हेंबरला मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
टेबल टॉपर टीम इंडिया : भारतानं या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. टीम सर्व ९ लीग सामने जिंकून १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिली. दुसरीकडे, विश्वचषकात चांगली सुरुवात करणारी न्यूझीलंडची टीम मध्ये गडबडली. मात्र शेवटी त्यांनी चौथ्या स्थानी राहून उपांत्य फेरी गाठली. त्यांनी ९ पैकी ५ सामने जिंकले. २०१९ च्या विश्वचषकात देखील टीम इंडिया टेबल टॉपर होती. तेव्हा टीमनं ९ पैकी ७ सामने जिंकत १५ गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. २०१९ मध्ये न्यूझीलंड देखील चौथ्या स्थानावर होता. त्यांनी ९ पैकी ५ सामने जिंकले होते. मनोरंजक बाब म्हणजे, २०१९ आणि २०२३ या दोन्ही विश्वचषकांमध्ये, पाकिस्तान ५ व्या स्थानावर राहिला आणि दोन्ही वेळेस न्यूझीलंड संघाचं उपांत्य फेरीचं तिकीट पाकिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून होतं!
वर्ल्ड कपमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड : वर्ल्ड कपमध्ये हे दोन संघ आतापर्यंत १० वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारतीय संघानं ४ वेळा तर न्यूझीलंड संघानं ५ वेळा विजय मिळवलाय. २०१९ च्या विश्वचषकात दोन संघांमधील साखळी सामना पावसामुळे वाहून गेला होता. तसं पाहता या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. साखळी सामन्यात भारतीय संघान न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला होता.