लखनऊ Cricket world cup 2023 IND vs ENG :यंदाच्या विश्वचषकातील 29 व्या सामन्यात आज गतविजेत्या इंग्लंड आणि भारतीय संघात लखनऊ इथं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर होणार आहे. मात्र या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा नाणेफेकीला येताच त्याचं अनोखं शतक पूर्ण होणार आहे.
रोहित 100व्यांदा करणार नेतृत्व : लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर जेव्हा रोहित शर्मा नाणेफेकीसाठी येईल, तेव्हा तो आजच्या सामन्यात 100 व्यांदा भारतीय संघाच नेतृत्व करेल. ही गोष्ट रोहितसाठी नक्कीच अभिमानास्प असेल. 2017 मध्ये रोहित शर्मानं पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. मात्र तेव्हा तो नियमित कर्णधार नव्हता. नंतर विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा नियमित कर्णधार बनला. कर्णधार म्हणून त्यानं आतापर्यंत भारतासाठी 99 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आज रोहित शर्मा मैदानात उतरताच 100 सामन्यात कर्णधार होण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. रोहितनं आतापर्यंत 39 एकदिवसीय, 51 टी-20 तर 9 कसोटी सामन्यांत भारताचं नेतृत्व केलंय. रोहितनं केलेल्या एकूण 99 सामन्यांपैकी 73 सामन्यांत भारतीय संघानं विजय मिळवलाय.
दोन्ही संघांची स्थिती काय : या विश्वचषकात भारतीय संघ हा एकमेव अजिंक्य संघ आहे. ज्यानं या विश्वचषकात आपले सर्व सामने जिंकले आहेत. विश्वचषकात खराब कामगिरीचा सामना करणाऱ्या इंग्लंड संघाला आतापर्यंत केवळ एकच सामना जिंकता आलाय. भारतीय संघ रविवारी मैदानात उतरेल तेव्हा त्यांचा विजयी रथ कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. मात्र, भारतीय संघाला इंग्लंडपासून सावध राहावं लागणार आहे. कारण उपांत्य फेरीत जाण्याचं दडपण इंग्लंड संघावरुन दूर झालंय आणि या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून ते जवळपास बाहेर पडले आहे. त्यामुळे इंग्लंड पूर्णपणे वेगळ्या शैलीत खेळू शकतो. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी आधीच सांगितलंय की, इंग्लंडला आता भारताची पार्टी खराब करायची आहे.