प्रयागराज (उत्तर प्रदेश) Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची उत्कंठा आता शिगेला पोहचली आहे. २०११ च्या विजयाची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्यानं टीम इंडिया रविवारी (१९ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध भिडेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारत या सामन्यात विजय मिळवून तिसऱ्यांदा वर्ल्डकप ट्रॉफी आपल्या नावे करेल, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.
किन्नर समुदायानं विशेष पूजा केली : भारतात सर्वत्र विश्वचषक जिंकण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. शनिवारी, उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये किन्नर समुदायानं विशेष पूजा केली. त्यांनी भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी आशीर्वाद मागितले. त्यांनी भारतीय संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी आणि भारतानं विश्वचषक जिंकावा यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्या हातात भारतीय संघातील खेळाडूंचे फोटो होते. याशिवाय भारतीय संघाच्या विजयासाठी ठिकठिकाणच्या मशिदींमध्येही नमाज अदा करण्यात येत आहे.
टीम इंडिया तुफान फार्मात : भारत या विश्वचषकात तुफान फार्मात आहे. टीम इंडियानं सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानं पहिले २ सामने गमावल्यानंतर सलग ८ सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतानं उपांत्य फेरीत गतविळेचा उपविजेता न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केला. तर ऑस्ट्रेलियानं चुरशीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. ऑस्ट्रेलिया ५ वेळचा वर्ल्ड चॅम्पियन असून, भारतानं २ वेळा विश्वचषक जिंकलाय.
ऑस्ट्रेलिया वरचढ राहिला आहे : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांवर नजर टाकली तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १५० एकदिवसीय सामने खेळले गेलेत. यापैकी भारतीय संघानं ५७ आणि ऑस्ट्रेलियाने ८३ सामने जिंकले आहेत. १० सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागल नाही. विश्वचषक सामन्यांबद्दल बोलायचं झाले तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १३ सामने खेळले गेलेत. ज्यापैकी ऑस्ट्रेलियानं ८ सामने जिंकले असून टीम इंडियानं ५ सामने जिंकलेत.
हेही वाचा :
- कोणाला मिळणार 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार, 'हे' आहेत प्रमुख दावेदार
- ऑस्ट्रेलियाच नॉकआऊट सामन्यांचा 'दादा'! कांगारूंमुळे अनेकदा मोडलं भारताचं विश्वचषकाचं स्वप्न
- वर्ल्ड कपचा भव्य समारोप समारंभ; वायुसेनेचा 'एअर शो', जाणून घ्या भारत-ऑस्ट्रेलिया फायनलपूर्वी काय विशेष तयारी