अहमदाबाद Cricket World Cup 2023 IND vs AUS Final : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा आता अंतिम टप्पा आलाय. या विश्वचषकात भारतीय संघाचा प्रवास सर्वात नेत्रदीपक ठरलाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला आतापर्यंत कोणीही पराभूत करु शकलेलं नाही. भारतीय संघानं 9 पैकी 9 साखळी सामने जिंकून 18 गुणांसह पहिल्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत त्यांनी न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करुन अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्कं केलंय. भारतीय संघाची ही चौथी अंतिम फेरी आहे. भारतीय संघानं दोनदा फायनल जिंकली आहे. यापुर्वी भारतीय संघानं 1983, 2003 आणि 2011 च्या विश्वचषकात अंतिम फेरी गाठली होती. त्यात 1983 आणि 2011 साली भारत विश्वविजेता ठरलाय.
ऑस्ट्रेलिया आठव्यांदा अंतिम फेरीत : या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाचा प्रवास चढ-उतारांचा राहिलाय. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघानं 9 पैकी 7 साखळी सामने जिंकले. 2 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियानं 14 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात त्यांनी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा 3 गडी राखून पराभव करुन त्यांना अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढत अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाची ही आठवी अंतिम फेरी आहे. यापैकी त्यांनी विक्रमी म्हणजे पाचवेळा अंतिम सामना जिंकलाय. कांगारुंनी 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकलाय.