नवी दिल्ली Cricket World Cup २०२३ : भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी बुधवारचा दिवस अत्यंत खास असेल. बुधवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. या सामन्यामध्ये सर्वांच्या नजरा विराट कोहलीकडे असतील. याला कारणही तसंच आहे. हे कोहलीचं घरचं मैदान असल्यानं तेथे उत्तम कामगिरी करण्यास तो उत्सुक असेल.
विराट कोहली फॉर्ममध्ये : दिल्लीचं अरुण जेटली स्टेडियम पूर्वी फिरोजशाह कोटला नावानं ओळखलं जायचं. या मैदानावर विराट भरपूर क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याला येथील विकेटची चांगली ओळख आहे. या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात विराट कोहली फॉर्ममध्ये दिसला. रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर विराटनं पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ धावांची संयमी खेळी केली होती. विराटनं केएल राहुलसोबत केलेल्या भागिदारीच्या बळावर भारतानं हा सामना ६ गडी राखून जिंकला. आता अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट आपला हा फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करेल.
प्लेइंग इलेव्हन खेळपट्टीवर अवलंबून असेल : विकेटकीपर केएल राहुलनंही पहिल्या सामन्यात आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली होती. त्यानं नाबाद ९७ धावांची खेळी करून संघाच्या विजयात महत्वाचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आघाडीचे फलंदाज वगळता भारताच्या सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. चेन्नईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल होती. त्यामुळे येथे भारतानं तीन फिरकीपटू उतरवले. या तीनही फिरकीपटूंनी या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. मात्र आगामी सामन्यांमध्ये पुन्हा तीन फिरकीपटूंना एकत्र संधी मिळणं अवघड आहे. कर्णधार रोहित शर्मानं सूचित केल्याप्रमाणे, टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन खेळपट्टीवर अवलंबून असेल.