कोलकाता Cricket World Cup 2023 : विश्वचषक 2023 च्या सेमीफायनलपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वीच उर्वरित स्पर्धेतून बाहेर झालाय. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला डाव्या घोट्याला दुखापत झाली होती. मात्र स्कॅननंतर पंड्या सध्या खेळण्याच्या स्थितीत नसल्याचं निश्चित झालंय. त्यामुळं त्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आलाय.
उर्वरित विश्वचषकातून पंड्या बाहेर : भारतीय संघानं विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केलाय. यात अष्टपैलू हार्दिक पंड्यानं महत्त्वाची भूमिका बजावलीय. अशातच दुखापतीमुळं संघातून बाहेर गेलेला पंड्या सेमीफायनलपर्यंत संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. मात्र, दुखापतीमुळं हार्दिक पंड्या विश्वचषकातील उर्वरित सामने खेळणार नसल्याचं समोर आलंय. भारतीय संघ व्यवस्थापन उपांत्य फेरीसाठी कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू इच्छित नाही. त्यामुळं त्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आलाय.
वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी : प्रसिद्ध कृष्णाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नसला तरी भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केलाय. त्यानं आतापर्यंत भारतीय संघाकडून 17 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 28 बळी घेतले आहेत. 12 धावांत 4 बळी ही प्रसिद्ध कृष्णाची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. देशांतर्गत क्रिकेट तसंच आयपीएलमध्ये त्यानं अनेकदा चमकदार कामगिरी केलीय. त्यामुळंच निवडकर्त्यांनी त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय.