हैदराबाद Cricket World Cup २०२३ : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला. आता तो न्यूझीलंडविरुद्ध धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्याला मुकणार आहे.
निवेदन जारी करून माहिती दिली : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. 'हार्दिकला स्कॅनसाठी नेण्यात आलं असून त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय. तो सतत बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल. तो २० ऑक्टोबर रोजी संघासोबत धर्मशालाला जाणार नाही. आता तो थेट लखनऊ येथे संघात सामील होईल, असं या निवेदनात म्हटलंय. लखनऊमध्ये २९ ऑक्टोबरला भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे.
हार्दिक संघाचा मुख्य आधारस्तंभ : न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात हार्दिक पांड्याची अनुपस्थिती कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखीचा विषय असेल. हार्दिक या विश्वचषकात भारतीय संघाचा मुख्य आधारस्तंभ आहे. तो आपल्या स्फोटक फलंदाजीनं एकहाती सामना जिंकवण्याची क्षमता राखतो. यासह त्याच्या गोलंदाजीतही वैविध्य असून तो जमलेली भागीदारी तोडण्यासाठी ओळखला जातो. यामुळे तो रोहित शर्माचा आवडता सहावा गोलंदाज आहे.
मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्याचा पर्याय :या विश्वचषकात भारतीय टॉप ऑर्डर फॉर्ममध्ये असल्यानं हार्दिक पांड्याला जास्त फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता रोहित शर्मा प्लेइंग ११ मध्ये हार्दिकच्या जागी एखाद्या स्पेशलिस्ट गोलंदाजाला संधी देऊ शकतो. शार्दूल ठाकूरला या विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मात्र तो काही कमाल दाखवू शकला नाही. रोहित शर्माकडे शार्दुलच्या जागी मोहम्मद शमीचा संघात समावेश करण्याचा पर्याय आहे. त्यासह पूर्णवेळ फलंदाज सूर्यकुमार यादवलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
सूर्यकुमार यादवलाही मिळू शकते संधी :टीम इंंडियासमोर दुसरा पर्याय म्हणजे, फक्त मोहम्मद शमीचा टीममध्ये समावेश करून शार्दुल ठाकूरचा अष्टपैलू खेळाडू म्हणून वापर करणे. मात्र, नेटमध्ये सातत्यपूर्ण सराव करणाऱ्या सूर्यकुमार यादवकडेही डोळझाक करून चालणार नाही. सूर्यकुमार यादव ३६० डिग्री फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या उपस्थितीनं आधीच मजबूत असलेल्या भारतीय फलंदाजीला आणखी धार मिळेल.
हेही वाचा :
- Cricket World Cup २०२३ IND vs BAN : दुखापतीमुळं हार्दिक पंड्या मैदानाबाहेर; विराट कोहलीनं पूर्ण केलं षटक
- Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर उभारला जाणार सचिनचा भव्य पुतळा! जाणून घ्या कधी होणार उद्घाटन