नवी दिल्ली Cricket World cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होईल.
विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड राहिलं : भारतीय संघाचा अलीकडचा फॉर्म बघितला तर रोहित शर्माचा संघ वरचढ दिसतो. मात्र आपण जर इतिहासात डोकावलं तर, ऑस्ट्रेलियन संघाचं पारडं जड राहिलं आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील हा ऑस्ट्रेलियाचा आठवा अंतिम सामना असेल. तर भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया ५ वेळचा जगज्जेता आहे, तर भारतीय संघानं २ वेळा विश्वचषक जिंकला आहे. जाणून घ्या विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलियाची आकडेवारी.
एकदिवसीय विश्वचषकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया :एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया एकूण १३ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारतीय संघानं ५ सामने जिंकले, तर ऑस्ट्रेलियानं ८ सामन्यांमध्ये विजय मिळवलाय. या दोन संघांमधील बाद फेरीच्या सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर, वाद फेरीत हे दोन संघ ३ वेळा आमनेसामने आलेत. यापैकी भारतानं फक्त एकदाच (२०११ विश्वचषक उपांत्यपूर्व सामना) विजय मिळवला. तर भारताला दोनदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
१) २००३ विश्वचषक फायनल :२००३ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत २ गडी गमावून ३५९ धावा केल्या. ३६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ३९.२ षटकांत २३४ धावांवर ऑलआऊट झाला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियानं भारतावर १२५ धावांनी दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंग केलं.
२) २०११ विश्वचषक उपांत्यपूर्व फेरी : २०११ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यातभारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ६ गडी गमावून २६० धावा केल्या. भारतीय संघानं हे लक्ष्य ४७.४ षटकांत ५ गडी गमावून गाठलं. या सामन्यात अष्टपैलू युवराज सिंगनं झुंजार फलंदाजी केली होती. त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचं सलग चौथा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न उद्ध्वस्त झालं.
३)२०१५ विश्वचषक उपांत्य फेरी :२०१५ च्याएकदिवसीय विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमनेसामने आले. यावेळी लढाई उपांत्य फेरीची होती. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं गतविजेत्या भारताचा दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना ७ विकेट गमावत ३२८ धावा ठोकल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव ४६.५ षटकात अवघ्या २३३ धावांवर आटोपला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियानं भारतावर ९५ धावांनी मात केली.
हेही वाचा :
- वर्ल्ड कपचा भव्य समारोप समारंभ; वायुसेनेचा 'एअर शो', जाणून घ्या भारत-ऑस्ट्रेलिया फायनलपूर्वी काय विशेष तयारी
- Weavers of Varanasi Gift Indian Players : विश्वचषक जिंकल्यास काशीमधून भारतीय क्रिकेट संघाला मिळणार ही 'खास' भेट