अहमदाबाद Cricket World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवार, १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतानं बुधवारी पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर गुरुवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला निकराच्या लढतीत पराभूत करून विक्रमी ८व्यांदा अंतिम फेरी गाठली.
दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत : अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून २००३ च्या विश्वचषक फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया विक्रमी सहाव्यांदा जेतेपदावर कब्जा करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. भारत सलग दहा सामने जिंकून अंतिम फेरीत दाखल झाला असून, ऑस्ट्रेलियानं सलग ८ सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना अहमदाबादमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल यात शंका नाही. हा शानदार सामना संस्मरणीय बनवण्यासाठी बीसीसीआयही विशेष तयारी करत आहे.
एअर शोचं आयोजन :रिपोर्टनुसार,भारतीय वायुसेनेची 'सूर्य किरण एरोबॅटिक टीम' विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एअर शो सादर करणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या मेगा मॅचच्या १० मिनिटं आधी हवेत स्टंट करून ही टीम प्रेक्षकांना रोमांचित करेल. रविवारी अंतिम फेरीपूर्वी ही टीम शुक्रवार आणि शनिवारी सराव करेल. भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीममध्ये साधारणपणे ९ विमाने असतात. त्यांनी या आधी देशभरात अनेक एअर शो आयोजित केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार :रिपोर्ट्सनुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्टेडियममध्ये उपस्थित राहू शकतात. पंतप्रधान कार्यालयाकडून मात्र याची अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. फायनलच्या दिवशी भव्य समारोप समारंभ देखील आयोजित केला जाईल. रिपोर्ट्सनुसार, या सोहळ्यात अनेक बॉलिवूड स्टार्स परफॉर्मन्स देणार आहेत. याशिवाय, हा सामना पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्स मोटेरा स्टेडियममध्येही येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
- “शमीनं फायनलमध्ये चांगली कामगिरी करावी”, बदरूद्दीन सिद्दीकी यांची ‘ईटीव्ही भारत’शी बातचीत
- 20 वर्षांपुर्वीचा बदला घेण्यासाठी कांगारुंशी भिडणार 'रोहितसेना'; दोन्ही संघांचा अंतिम सामन्यांचा इतिहास काय आहे?