हैदराबाद/ लखनऊ Cricket World Cup 2023 : यंदाच्या विश्वचषकात प्रत्येक सामन्यात अनेक रेकॉर्ड तुटताना दिसत आहेत, तर काही अनपेक्षित निकालही लागत आहेत. गत विजेत्या इंग्लंड संघाला अफगाणिस्ताननं आपल्या फिरकीच्या जोरावर नमवून या वर्षीच्या विश्वचषकातील पहिला मोठा उलटफेर केलाय. यामुळं विश्वचषकात तब्बल पाच वेळा विजेतेपदाची माळ आपल्या गळ्यात घातलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची परिस्थिती मात्र अत्यंत दयनीय झालीय. सध्या ते गुणतालिकेत तळाच्या म्हणजेच दहाव्या स्थानावर आहेत. अशी नामुष्की त्यांच्यावर विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच ओढावली आहे. त्यातच आज त्यांचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. हा सामना त्यांच्यासाठी करो अथवा मरो यासारखाच असणार आहे. या दोन्ही संघातील हा सामना लखनऊ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकलाय.
सर्वच सामने फायनल प्रमाणे : हा सामनाच नव्हे, तर इथून पुढचे सर्व सामने आमच्यासाठी फायनल सारखेच असल्याचं मत सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं व्यक्त केलंय. त्याच्या या वक्तव्यावरून ऑस्ट्रेलिया संघाची अवस्था कशी आहे हे दिसून येईल. ऑस्ट्रेलिया संघात एकाहून अधिक एक मॅचविनर खेळाडू आहेत. डेव्हिड वॉर्नर सारखा सलामिवीर तर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नससारखे तगडे मिडल ऑर्डर फलंदाज आहेत. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल सारखा विस्फोटक फलंदाज आहे. तर गोलंदाजी मध्ये स्वतः कर्णधार पॅट कमिन्स, विश्वचषकात पन्नास हून अधिक बळी घेणारा मीचेल स्टार्क, जोश हेजलवूड, फिरकीपटू ॲडम झंपा यांचा समावेश आहे. असे दिग्गज खेळाडू असतानाही ऑस्ट्रेलियावर ही परिस्थिती येणं हा एक क्रिकेट विश्वासासाठी धक्काच आहे.
दोन्ही संघाला विजय आवश्यक : यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूप खराब झाली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील कांगारू संघाला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवांचा सामना करावा लागला. तर प्रतिस्पर्धी श्रीलंका देखील पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत झालीय. आता आजच्या अतितटीच्या सामन्यात कोणता संघ विजयी मार्गावर परत येईल हे पहावं लागेल. मात्र स्पर्धेतीलं आपल आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघाला विजय आवश्यक आहे.