धर्मशाळा Cricket World Cup 2023 AUS vs NZ : धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे शेजारी आज दिवसातील पहिल्या सामन्यात आमनेसामने येणार आहेत. या विश्वचषकात आतापर्यंत न्यूझीलंडनं पाचपैकी 4 सामने जिंकले असून त्यांचे 8 गुण आहेत. गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन ते 2015 विश्वचषकातील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील.
काय आहेऑस्ट्रेलियाची स्थिती : दुसरीकडं ऑस्ट्रेलियाच्या स्पर्धेची सुरुवात दोन पराभवांनी झाली, पण आता ते विजयी मार्गावर परतले आहेत. त्यांनी सलग 3 सामने जिंकत जोरदार पुनरागमन केलंय. त्यांचे 6 गुण असून गुणतालिकेत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन शेजारी देशात गुणतालिकेत फक्त दोन गुणांचा फरक आहे.
कशी होणारसंघ निवड : न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू फिट असून सर्वजण उपलब्ध आहेत. त्यामुळे गेल्या सामन्याप्रमाणेच तो संघ मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे. तर अंगठ्याच्या दुखापतीमुळं न्यूझीलंडनं कर्णधार केन विल्यमसनला गमावलंय. परंतु, त्यांचे इतर सर्व खेळाडू उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी किवींचा संघ याच प्लेइंग 11ची निवड करेल, अशी आशा आहे.
हेड टू हेड रेकॉर्ड काय : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 141 वेळा आमनेसामने आले आहेत. यात ऑस्ट्रेलियानं आपल वर्चस्व गाजवत 95 सामने जिंकले आहेत, तर किवी संघानं केवळ 39 सामने जिंकले आहेत. सात सामने निकालाविना संपले आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात हे दोन्ही संघ 11 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियानं 8 वेळा विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडनं केवळ 3 वेळा विजय मिळवलाय.