धर्मशाळा Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात २७ व्या सामन्यात आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आमनेसामने होते. धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं.
ट्रॅव्हिस हेडचं शतक : प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी अत्यंत आक्रमक सुरुवात केली. डेव्हिड वॉर्नर (८१) च्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड (१०९) शतकानंतर फिरकीपटू ग्लेन फिलिप्सचा शिकार बनला. यानंतर आलेला स्टीव्ह स्मिथ (१८) फारसा काही करु शकला नाही. तोही फिरकीपटू ग्लेन फिलिप्सच्या जाळ्यात अडकला. मागच्या सामन्यात ऐतिहासिक शतक ठोकणाऱ्या मॅक्सवेलनं या सामन्यातही २४ चेंडूत तुफानी ४१ धावांची खेळी केली. जोश इंग्लिश आणि पॅट कमिन्स यांनी तळाला येऊन अनुक्रमे ३८ आणि ३७ धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सनं ३७ धावा देत ३ बळी घेतले. ऑस्ट्रेलियानं ४९.२ षटकांत सर्वबाद ३८८ धावा केल्या.
रचिन रविंद्रची खेळी व्यर्थ : मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर कॉनवे आणि विल यंगनं अनुक्रमे २८ आणि ३२ धावांंचं योगदान दिलं. हे दोघं बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रचिन रविंद्रनं सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. त्यानं ८९ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीनं शानदार ११६ धावा ठोकल्या. डॅरिल मिशेलनं ५४ धावांचं योगदान दिलं. तर निशम ५८ धावांवर रन आऊट झाला. अखेरच्या षटकापर्यंत सामना रोमांचक अवस्थेत पोहचला होता. मात्र स्टार्कनं मोक्याच्या क्षणी टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. कांगारुंकडून अॅडम झम्पानं ७४ धावा देत ३ बळी घेतले.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन :
- ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झम्पा
- न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, जेम्स निशम, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट
हेही वाचा :
- Cricket World Cup २०२३ : पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर होण्याच्या वाटेवर, रोमांचक सामन्यात द. आफ्रिकेनं केला पराभव