नवी दिल्ली Cricket World Cup 2023 AUS vs NED : विश्वचषकातील 24 वा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड त्यांच्या पाचव्या सामन्यासाठी आमनेसामने येतील. पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया 4 सामन्यांतून 2 विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर नेदरलँड्स 4 सामन्यांतून एका विजयासह सातव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून गुणतालिकेत आपलं स्थान मजबूत करण्याकडे दोन्ही संघांचं लक्ष असेल.
विजयामुळं ऑस्ट्रेलिया आत्मविश्वासात : मागील सामन्यात बंगळुरूमध्ये कांगारूंनी पाकिस्तानवर 62 धावांनी शानदार विजय नोंदवला होता. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 367 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर अॅडम झाम्पानं चार विकेट घेतल्या आहेत. त्यामुळं ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला 45.3 षटकांत 305 धावांत गुंडाळलं. या विजयामुळं ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
नेदरलँड्सची अवस्था काय : दुसरीकडे, नेदरलँड्सला श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात पाच विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील संघानं प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकांत सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि लोगन व्हॅन बीक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 262 धावा केल्या आहेत. दरम्यान, श्रीलंकेनं 10 चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठलं. मात्र, या विश्वचषकात नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेसारख्या मजबूत संघाचा पराभव केलाय. सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया यां संघांमध्ये आत्तापर्यंत 2 सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यांत ऑस्ट्रेलियानं बाजी मारलीय.