नवी दिल्ली Cricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकात आज झालेल्या सामन्यात पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियानं नवख्या नेदरलॅंडचा ३०९ धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकांत ३९९-८ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलॅंडचा संघ २१ षटकांत अवघ्या ९० धावांवर ऑलआऊट झाला.
डेव्हिड वॉर्नरची शतक : या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र सलामीवीर मिचेल मार्श १५ चेंडूत ९ धावा करून स्वस्तात बाद झाला. त्यानंतर आलेल्या स्टीव स्मिथनं डेव्हिड वॉर्नरच्या मदतीनं जोरदार फटकेबाजी सुरु केली. या दोघांनी नेदरलॅंडच्या गोलंदाजांना सामन्यात परतण्याची एकही संधी दिली नाही. वॉर्नरनं या विश्वचषकातील त्याचं दुसरं शतक ठोकलं. तो ९३ चेंडूत १०४ धावा करून बाद झाला.
मॅक्सवेलची ऐतिहासिक खेळी : ऑस्ट्रेलियाकडून स्टिव स्थिथनं ६८ चेंडूत ७१ धावा केल्या. तर लाबुशेननं ५७ चेंडूत ६२ धावांचं योगदान दिलं. आजचा सामना खऱ्या अर्थानं गाजवला तो स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलनं. त्यानं तुफानी फलंदाजी करत अवघ्या ४० चेंडूत शतक ठोकलं. हे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक आहे. तो ४४ चेंडूत १०६ धावा करून परतला. ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत ३९९-८ धावा केल्या. नेदरलॅंडकडून वॅन बीकनं ७४ धावा देत ४ बळी घेतले.
अॅडम झम्पाचे ४ बळी : ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ४०० धावांच्या विशालकाय लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलॅंडची टीम केव्हाच सामन्यात दिसली नाही. नियमित अंतरानं गडी बाद होत गेल्यानं त्यांची फलंदाजी ढेपाळली. नेदरलॅंडकडून सलामीवीर विक्रमजीत सिंगनं सर्वाधिक २५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅडम झम्पानं चिवट गोलंदाजी केली. त्यानं ३ षटकांत फक्त ८ धावा देत ४ बळी घेतले.