मुंबईCricket World Cup २०२३ : क्रिकेट विश्वचषकाच्या २३ व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेसमोर बांग्लादेशचं आव्हान होतं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांग्लादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं ५० षटकांत ३८२-५ धावा केल्या.
क्विंटन डी कॉकची तुफान फटकेबाजी : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक आज तुफान फार्मात होता. त्यानं बांग्लादेशची गोलंदाजी फोडून काढली. डी कॉकनं १४० चेंडूत १५ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीनं १७४ धावा ठोकल्या. हे वनडे क्रिकेटमधील त्याचं १९वे शतक आहे. विकेटकीपर हेनरिक क्लासेननं देखील तुफान फटकेबाजी केली. त्यानं फक्त ४९ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीनं ९० धावा कुटल्या. कर्णधार एडन मार्करमनं ६९ चेंडूत ६० धावांचं योगदान दिलं. बांग्लादेशकडून हसन महमूदनं ६७ धावा देत २ बळी घेतले.
महमुदुल्लाची एकाकी झुंज : धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशच्या फलंदाजांना द. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी स्थिर होऊचं दिलं नाही. नियमित अंतरानं विकेट पडत गेल्यानं बांग्लादेशवर दबाव वाढला. बांग्लादेशकडून महमुदुल्लानं एकाकी किल्ला लढवत शतक साजरं केलं. त्यानं १११ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं १११ धावा केल्या. बांग्लादेशचे इतर फलंदाज मात्र २५ धावांचा आकडाही गाठू शकले नाही. ते ४६.४ षटकांत २३३ धावा करून ऑलआऊट झाले. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीनं ६२ धावा देत ३ विकेट घेतल्या.