कोलकाता Babar Azam Security : कोलकाता शहरातील प्रतिष्ठित ईडन गार्डन्सवर ३१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानचा सामना बांग्लादेशशी होणार आहे. या सामन्यासाठी जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम शनिवारी शहरात दाखल होईल, तेव्हा त्याच्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
बाबर आझमला एवढी सुरक्षा का : भारतात या आधी कोणत्याही विरोधी संघातील खेळाडू किंवा कर्णधारासाठी अशी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही. अशा स्थितीत साहजिकच प्रश्न पडतो की बाबर आझमच खास का? निःसंशयपणे, तो एक विशेष खेळाडू आहे. त्याची गणना जगातील अव्वल दर्जाच्या फलंदाजांमध्ये होते. त्यामुळेच त्याचे पाकिस्तानात आणि भारतात देखील प्रचंड चाहते आहेत. मात्र तो स्वभावानं अंतर्मुख असून तो प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत करतो.
अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था : कोलकाता पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबर आझम हॉटेलच्या ज्या खोलीमध्ये थांबणार आहे, तेथे फक्त काही निवडक पोलिस कर्मचाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आलाय. तसेच बाबरची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अशा प्रकारे ठेवण्यात आली आहे की, तो जर इडन गार्डन्सच्या सीमेवर फिल्डिंग करत असला तर कोलकाता पोलिसांचे विशेष प्रशिक्षित अधिकारी त्याचं स्टँडमध्ये उपस्थित प्रेक्षकांच्या टिप्पण्या आणि रागापासून संरक्षण करण्यासाठी सीमारेषेवर तैनात असतील. कोलकाता पोलिसांच्या अतिरिक्त आयुक्तांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, ही सुरक्षा व्यवस्था अभूतपूर्व आहे.