मुंबई - India v Pakistan Cricket World Cup match : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान संघादरम्यान विश्वचषकातील सामना खेळला जाणार आहे. हा सामना रंगतदार होणार याची खात्री तमाम क्रिकेट चाहत्यांना आहे, पण सामन्यापूर्वीचं सत्रदेखील मनोरंजक करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतलाय. लोकप्रिय गायक अरिजित सिंग त्याच्या मधुर आवाजानं उपस्थित लाखाहून अधिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केलंय की अरिजित सिंग 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये प्री-मॅच शो दरम्यान आपला परफॉर्मन्स सादर करेल.
X वर लिहिलेल्या पोस्टमध्ये बीसीसीआयनं लिहिलंय, 'भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना खास परफॉर्मन्सनं सुरू होईल. मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतमय मैफिलीसाठी तुम्ही सज्ज व्हा. जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान- नरेंद्र मोदी स्टेडियमवर अवतरणार अरिजित सिंग! 14 ऑक्टोबर दुपारी 12:30 वाजता होणाऱ्या प्री-मॅच शोमध्ये सामील व्हा.'
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील वैर खूप जुनं आणि जगाचं लक्ष वेधणारं आहे. या दोन देशांमधील क्रिकेटच्या सामन्यांना जागतिक स्तरावर लक्षणीय प्रेक्षकवर्ग मिळत असतो. दोन्ही संघ सध्या फिट आणि फॉर्ममध्ये असल्यामुळे हा सामना अतिशय चुरशीचा होणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणीस्तान संघावर सलग दोन विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ शनिवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना करेल. आशिया चषक सामन्यात दोन सामने पाकिस्तानसोबत खेळून विजेता ठरलेला भारतीय संघ विश्वचषकाच्या लढाईसाठी सज्ज झालाय. यातील ग्रुप स्टेजमधील एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता, तर सुपर फोर टप्प्यातील पुढच्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला होता.
भारताने त्यांच्या 2023 च्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवून केली, तर अफगाणीस्तान संघावर मोठा विजय मिळाल्यानं खेळाडूंचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय. पाकिस्तान संघानेही दोन सलग विजय मिळवून आपली क्षमता दाखवून दिली आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दोन सामन्यामध्ये फलंदाजीत अचाट कामगिरी करुन दाखवली आहे, तर जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी आपला गोलंदाजीतील दरारा कायम ठेवलाय. 'मेन इन ब्लू'चे झुंझार खेळाडू ५० षटकांच्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध विजयी मालिका सुरू ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत राहतील अशी चाहत्यांची अपेक्षा असेल.