पुणे 7 Records Made in NZ vs SA Match : एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा दबदबा कायम आहे. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. बुधवारी रात्री आफ्रिकेनं न्यूझीलंडचा 190 धावांच्या मोठ्या फरकानं एकतर्फी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकनं या स्पर्धेतील चौथं शतक झळकावलंय. त्यानं 116 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या तडाख्यासह 114 धावा केल्या. याशिवाय त्यानं दुसेनसोबत 200 धावांची उत्कृष्ट भागीदारीही केलीय. दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात झालेले 7 रेकॉर्ड कोणते वाचा सविस्तर.
दक्षिण आफ्रिका संघाच्या सर्वाधिक 350+ धावा : पुण्यात प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेनं 50 षटकांत 5 गडी गमावून 357 धावा केल्या. आफ्रिकेनं या विश्वचषकात 7 सामने खेळले आहेत आणि चार वेळा विक्रमी 350 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. एका विश्वचषकात चार वेळा 350 हून अधिक धावा करणारा दक्षिण आफ्रिका पहिला संघ ठरलाय. त्यांनी एकाच स्पर्धेत तीनदा 350 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडलाय.
विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना 15 षटकार ठोकले. या खेळीसह, संघानं या विश्वचषकात 82 षटकार पूर्ण केले आणि विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ बनलाय. दक्षिण आफ्रिकेनं 2019 च्या विश्वचषकात 76 षटकार मारणाऱ्या इंग्लंडचा विक्रम मोडीत काढलाय.
यष्टीरक्षक म्हणून डी कॉकच्या सर्वाधिक धावा : दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकनं या विश्वचषकात 545 धावा केल्या आहेत. विश्वचषकात 500 धावा करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरलाय. तसंच डी कॉक विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाजही बनलाय. त्यानं श्रीलंकेचा यष्टीरक्षक फलंदाज कुमार संगकाराचा विक्रम मोडलाय, त्यानं 2015 च्या विश्वचषकात 541 धावा केल्या होत्या.
विश्वचषकात यष्टिरक्षकाकडून सर्वाधिक षटकार :न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात क्विंटन डी कॉकनं 3 षटकार ठोकले. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्यानं 18 षटकार मारले आहेत. यासह डी कॉक विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा यष्टीरक्षक फलंदाज बनलाय. त्यानं या विश्वचषकात श्रीलंकेचा यष्टीरक्षक कुसल मेंडिसचा विक्रम मोडीत काढला. त्याच्या नावावर 14 षटकार आहेत.
यष्टीरक्षक म्हणून डी कॉकची सर्वाधिक शतकं :क्विंटन डी कॉकनं न्यूझीलंडविरुद्ध 116 चेंडूत 114 धावांची खेळी केली. या खेळीसह त्यानं या विश्वचषकात 4 शतकं पूर्ण केली आहेत. विश्वचषकात सर्वाधिक शतकं झळकावणारा तो यष्टीरक्षक फलंदाज बनलाय. त्यानं 2015 मध्ये सलग 4 शतकं झळकावणाऱ्या श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या विक्रमाची बरोबरी केली.
दक्षिण आफ्रिका संघाकडून सर्वाधिक शतकं : 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाच्या खेळाडूंनी एकूण 8 शतकं झळकावली आहेत. बुधवारच्या सामन्यातही आफ्रिकेच्या दोन फलंदाजांनी शतकं झळकावली. यासह आफ्रिकेनं श्रीलंकेच्या विक्रमाची बरोबरी केलीय. श्रीलंकेच्या फलंदाजांनी 2015 च्या विश्वचषकात 8 शतकं झळकावली होती.
डी कॉक आणि ड्युसन यांनी दुसऱ्यांदा 200 धावांची भागीदारी : आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन यांनी विश्वचषकात दुसऱ्यांदा 200 धावांची भागीदारी केलीय. याआधी याच दोन्ही फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्ध 202 धावांची भागीदारी केली होती. या दोघांनी विश्वचषकात सर्वाधिक 200 धावांची भागीदारी करण्याच्या विक्रमाची बरोबरी केलीय. याआधी श्रीलंकेच्या उपुल थरंगा आणि तिलकरत्न दिलशान यांनी 2011 च्या विश्वचषकात दोनदा द्विशतकी भागीदारी केली होती.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला दुष्काळात तेरावा महिना! ग्लेन मॅक्सवेल नंतर 'हा' स्फोटक फलंदाज इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून 'आऊट'
- World Cup 2023 IND vs SL : विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध विजयाची हॅट्रीक करण्यासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात, काय असेल संघाची रणनीती?
- Ex Cricketer Anshuman Gaikwad : यंदाचा विश्वचषक आपणच जिंकणार; माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांनी व्यक्त केला विश्वास