हैदराबाद 45 Special : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं काल अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत विक्रमी खेळी केली. रोहितनं शानदार विक्रमी शतक झळकावलं. या खेळीत त्यानं ख्रिस गेलचा अनेक वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला. आता रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरलाय. हा विक्रम मोडल्याबद्दल ख्रिस गेलनं रोहितचं खास शैलीत अभिनंदन केलंय. त्यानं रोहितसोबतचा एक फोटोही शेअर केलाय.
काय म्हटला गेल : युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलनं एक्स (ट्विटर) वर एक फोटो शेअर केलाय. यात तो रोहितसोबत दिसतोय. रोहित आणि गेलचा जर्सी क्रमांक एकच आहे. हे दोन्ही खेळाडू 45 क्रमांकाची जर्सी घालतात. गेलनं फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार. रोहित शर्माचं अभिनंदन.' गेलच्या या पोस्टला हजारो लोकांनी लाईक केलंय, तर यावर अनेक चाहत्यांनीही प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
अनेक खेळाडूंकडून अभिनंदन : ख्रिस गेलसोबतच भारताचा माजी सलामीविर विरेंद्र सेहवागनंही रोहित शर्माचं कौतुक करत त्याच्या शैलित अभिनंदन केलंय. तसंच माजी अष्टपैलू सुरेश रैना, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनंही रोहित शर्माचं अभिनंदन करत कौतुक केलंय. याशिवाय शिखर धवन, फिरकीपटू युजवेंद्र चहल यांच्यासह अनेक खेळाडूंनी रोहित शर्माचं अभिनंदन केलंय.
गेलचा विक्रम मोडीत : रोहितनं आतापर्यंत खेळलेल्या 453 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 556 षटकार मारले आहेत. आता तो जगात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारणारा खेळाडू ठरलाय. यापूर्वी हा विक्रम गेलच्या नावावर होता. गेलनं 483 सामन्यात 553 षटकार मारले आहेत. या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी तिसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिदीनं 524 सामन्यात 476 षटकार मारले आहेत. तर भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. धोनीनं 359 षटकार मारले आहेत.
सामन्यात भारताचा दणदणीत विजय : विश्वचषक 2023 च्या 9व्या सामन्यात अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना 272 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतानं हे लक्ष्य अवघ्या 35 षटकांत पूर्ण केलं. कर्णधार रोहितनं 84 चेंडूत 131 धावा केल्या. या खेळीत त्यानं 16 चौकार आणि 5 षटकार मारले. तर इशान किशननं 47 धावा केल्या. विराट कोहलीनं नाबाद अर्धशतक झळकावत 56 चेंडूत 55 धावा केल्या. कोहलीनं आपल्या खेळीत 6 चौकार मारले.
हेही वाचा :
- ICC CWC 2023 India vs Pakistan : विश्वचषकातील महामुकाबल्यामुळे हॉटेल्स व्यावसायिकांची 'चांदी', हॉटेलमधील रुमच्या किमती गगनाला
- ICC CWC 2023 India vs Pakistan : भारत की पाकिस्तान? कोण जिंकणार 'हाय-व्होल्टेज' सामना? काय आहे आजपर्यंतचा इतिहास, वाचा...
- IND vs AFG : भारताचा अफगाणिस्तानवर धमाकेदार विजय, रोहितचं शतक, कोहलीचं अर्धशतक