गुवाहाटी Cricket Fan Died : रविवारी (२० नोव्हेंबर) क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर १४० कोटी भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. सुमारे दीड महिना चाललेल्या या स्पर्धेत टीम इंडियानं शानदार कामगिरी केली. मात्र फायनलमध्ये ऐन मोक्याच्या वेळी भारतानं कच खाल्ली आणि ऑस्ट्रेलियानं विक्रमी सहाव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला.
देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला : या पराभवानं देशभरातील क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. गुवाहाटीतील एक २० वर्षाचा चाहता कदाचित हा धक्का सहन करू शकला नाही. गुवाहाटीत राहणारा तरुण मृणाल मजुमदार भारताच्या फायनलमधील पराभवानंतर खूप व्यथित झाला होता. त्याला विश्वासच बसत नव्हता की, भारताचं विजेतपदाचं स्वप्न भंग पावलं आहे. मात्र भारताच्या पराभवानंतर मृणालचा अशाप्रकारे अंत होईल याचा कोणालाच अंदाज नव्हता.
भारताचा पराभव जिव्हारी : मृणालच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो फायनल मॅच पाहून रात्री ११ वाजता झोपायला गेला. झोपण्याआधी तो धडधाकट होता. त्याला कुठलाही आजार नव्हता. मात्र तो सकाळी उशिरापर्यंत झोपेतून उठलाच नाही. शेवटी मृणालच्या कुटुंबीयांना तो झोपलेल्या खोलीचा दरवाजा तोडून आत जावं लागलं. त्यावेळी त्यांना तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. कुटुंबीयांनी मृणालला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मृत मृणाल मजुमदार हा बिरुबारी आयटीआयचा विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मृणालला कुठल्याही गंभीर आजाराचा इतिहास नाही.
ओडिशातील तरुणानं जीवन संपवलं : अशाच प्रकारच्या दुसऱ्या एका घटनेत, भारताचा पराभव जिव्हारी लागल्यानं ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील एका तरुणानं आत्महत्या केली. देवरंजन दास (२३) असं मृताचं नाव आहे. देवरंजन सोमवारी सकाळी शेजारच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तात्काळ जाजपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. देवरंजनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तो मानसिक विकारानं त्रस्त होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. तो फायनल मॅच पाहत होता. मात्र, भारतीय संघ हरल्यानंतर त्यानं गळफास लावून घेतला असावा. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
- रडवेल्या भारतीय संघाला मोदींनी घेतलं कवेत; वर्ल्डकप पराभवानंतर ड्रेसिंगरुममध्ये पोहोचले मोदी, शमीची भावनिक पोस्ट