माउंट मौनगानुई : आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women World Cup ) स्पर्धेतील चौथा सामना पार पडला. हा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 107 धावांनी धूळ चारली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 244 धावा केल्या. याला प्रत्युतर देताना पाकिस्तानचा संघ 137 धावांवर गारद झाला.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ( India first batting decision ) घेतला होता. त्यानुसार भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 7 बाद 244 धावा केल्या होत्या. यामध्ये स्मृती मंधाना 52, दीप्ती शर्मा 40, स्नेहा राणा नाबाद 53 आणि पुजाच्या 67 धावांच्या जोरावर ही धावसंख्या उभारली होती. पाकिस्तान कडून गोलंदाजी करताना निदा दार आणि नशरा संधूने दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर इतर गोलंजांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पाकिस्तान संघ 245 धावांचा पाठलाग करायला उतरला असता त्यांची सुरुवात खराब झाली. पाकिस्तानने आपले पाच फलंदाज 22 षटकांत 70 धावांवर गमावले. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. त्यानंतर देखील भारतीय संघाने आपल्या भेदक गोलंदाजीने पाकिस्तान संघाच्या फलंदाजीचा गळा आवळला. पाकिस्तानच्या एका ही फलंदाजाला या सामन्यात अर्धशतक लगावता आले नाही.