क्राइस्टचर्च:आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक ( ICC Women's ODI World Cup ) स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्यात आला आहे. गुरुवारी या स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने आले होते. हा सामना इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर 137 धावांनी मात करत जिंकला. या विजयाबरोबरच इंग्लंड संघाने आठव्यांदा महिला विश्वचषकाचा अंतिम सामना गाठला आहे.
सलामीवीर डॅनी व्याट ( Opener Danny Wyatt ) (129) आणि फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन (6/36) यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी हॅगली ओव्हलवर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर 137 धावांनी शानदार विजय मिळवला. इंग्लंडने त्यांच्या विजेतेपदाच्या बचावाची सुरुवात तीन पराभवांसह केली, परंतु गुरुवारच्या उपांत्य फेरीसह पुढील पाच सामने जिंकण्यासाठी संघर्ष केला आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. आता रविवारी अंतिम फेरीत त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
दबावपूर्ण नॉकआऊट सामन्यात 294 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने कधीही लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला नाही. वेगवान गोलंदाज अन्या श्रबसोलेने पहिल्या दोन षटकांत लॉरा वोल्व्हर्ट आणि लिझेल ली या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद केले. लारा गुडॉल आणि कर्णधार स्युने लूस ( Captain Sune Luce ) यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला, पण इंग्लंडने प्रत्युत्तर दिले. कारण केट क्रॉसने लूसला क्लीन बोल्ड केले. गुडॉलने चार्ली डीनविरुद्ध धावा काढण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू स्टंपला लागला. एक्लेस्टोनने सहा गडी बाद 36 धावा दिल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ 38 षटकात 156 धावांवर सर्वबाद झाला.
तत्पूर्वी, इंग्लंडकडून डेनी व्याटने 125 चेंडूत 129 धावा केल्या, सोफिया डंकलेने 72 चेंडूत 60 धावा केल्या, त्यामुळे इंग्लंडची धावसंख्या 50 षटकांत 8 गडी गमावून 293 पर्यंत पोहोचली. त्याच वेळी, त्यांचे अनुभवी वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईल (3/46) आणि मारिजन कॅप (2/52) यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली गोलंदाजी केली.