हैदराबाद :सध्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाचा ( ICC Women's ODI World Cup ) थरार न्यूझीलंडमध्ये सुरु आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघाचा समावेश आहे. ज्यामध्ये यजमान न्यूझीलंड व्यतिरिक्त गतविजेता इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशचे संघ या स्पर्धेत सहभागी आहेत. या स्पर्धेतील पंधरावा सामना भारत विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारतावर 4 विकेट्स राखून मात केली. त्यानंतर आयसीसी महिला विश्वचषकाच्या गुणतालिकेत काहीस बदल झाला आहे.
स्पर्धेच्या राऊंड रॉबिन टप्प्यात ( Round robin stage ) एकूण 28 सामने खेळवले जातील. आठही संघ एकमेकांविरुद्ध एक एक सामना खेळणार आहेत. यापैकी अव्वल 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, अंतिम सामना 3 एप्रिल रोजी क्राइस्टचर्च येथे खेळवला जाईल. तत्पुर्वी गुणतालिकेत काही बदल झाले आहेत. भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमाकांवर आहे. भारतीय संघाचा इंग्लंड विरुद्ध पराभव झाल्याने त्यांच्याकडे 4 गुण आहेत. तसेच पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आहेत.