ब्रिस्टोल - भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने इंग्लंड विरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार फलंदाजी केली. तिने या सामन्यात ७२ धावांची खेळी साकारली होती. तिला या कामगिरीचा फायदा आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत झाला असून तिची कामगिरी सुधारली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. पण या सामन्यात मितालीने एकाकी झुंज देत ७२ धावांची खेळी केली होती. या कामगिरीमुळे महिला फलंदाजाच्या क्रमवारीत ती 3 स्थानानी वर जात पाचव्या स्थानी विराजमान झाली आहे.
टॅमी ब्यूमोंट अव्वलस्थानी कायम, स्मृती मंधानाची घसरण
महिला फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडची सलामीवीर टॅमी ब्यूमोंट हिने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. तिने भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद ८७ धावांची खेळी केली. यामुळे तिला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ती ७९१ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर नाबाद ७४ धावांची खेळी करणारी नताली सायवर नवव्या स्थानावरून आठव्या स्थानी पोहोचली आह. भारताची सलामीवीर स्मृती मंधानाची दोन स्थानाने घसरण झाली आहे. ती सातव्या स्थानावरुन ९ व्या स्थानी पोहोचली आहे.