दुबई - न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात दमदार सांघिक कामगिरी करत विजेतेपद पटकावले होते. आता न्यूझीलंडच्या खेळाडूंना अंतिम सामन्यातील कामगिरीचा फायदा क्रमवारीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी पोहोचला आहे.
अंतिम सामन्याआधीपूर्वी केन विल्यमसनची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत घसरण झाली होती. पण अंतिम सामन्यात त्याने दोन्ही डावांत ४९ व नाबाद ५२ धावा करून पुन्हा अव्वलस्थान पटकावले. आयसीसीने आज ताजी क्रमवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा -WI vs SA ३rd T२०: अखेरच्या चेंडूवर षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे अखेरचे ६ चेंडू
केन विल्यमसन फलंदाजांच्या क्रमवारीत ९०१ गुणांसह अव्वल स्थानी आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ ८९१ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन याने तिसरे स्थान पटकावले आहे. त्याचे ८७८ गुण आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ८१२ गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटचे ७९७ गुण आहेत. तो या यादीत पाचव्या स्थानी आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स ९०८ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. भारताचा आर अश्विन (८६५), न्यूझीलंडचा टीम साऊदी (८२४), ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड (८१६) आणि न्यूझीलंडचा निल वॅगनर (८१०) हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर (३८४) पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर इंग्लंडचा बेन स्टोक्स (३७७) दुसऱ्या स्थानावर आहेत. आर अश्विन तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. रवींद्र जडेजा आणि शाकिब अल हसन अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
हेही वाचा -आनंदाची बातमी : द्युती चंद, श्रीहरी नटराज आणि सीमा पुनियाचे टोकियो ऑलिम्पिक तिकिट पक्के
हेही वाचा -'खेलरत्न'साठी BCCI करणार मिताली राज, रविचंद्रन अश्विनच्या नावाची शिफारस