मुंबई - आयसीसी टी-20 विश्व करंडक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना कधी खेळला जाणार याची माहिती समोर आली आहे. दोन्ही संघातील हा सामना 24 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये खेळला जाणार आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
मागील महिन्यात आयसीसीने टी-20 विश्वकरंडक ओमान आणि युएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. भारत या विश्वकरंडकाचे यजमानपद भूषवत आहे. ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर यादरम्यान पार पडणार आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी दोन गट करण्यात आले आहेत. यात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी ग्रुप 2 मध्ये आहेत. 20 मार्च 2021 पर्यंतच्या टीम रॅकिंगनुसार हे गट पाडण्यात आले आहेत.
ग्रुप 1 मध्ये गतविजेता वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. तर ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या संघाचा समावेश आहे. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 मध्ये आणखी दोन संघ पात्रता फेरीतून निवडले जातील.