नवी दिल्ली ICC T20 Ranking : भारताचा युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीचा फायदा मिळाला आहे. आयसीसीनं बुधवारी जारी केलेल्या ताज्या टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत त्यानं पाच स्थानांनी झेप घेत अव्वल स्थान पटकावलं.
अव्वल १० मध्ये बिश्नोई एकमेव भारतीय : रवी बिश्नोईनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत ५ सामन्यात ९ विकेट घेतल्या होत्या. २३ वर्षीय बिश्नोईचे ६९९ रेटिंग गुण आहेत. त्यानं अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानला (६९२ गुण) अव्वल स्थानावरून दूर केलं. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा आणि इंग्लंडचा आदिल रशीद संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर असून दोघांचे ६७९ गुण आहेत. अव्वल पाच गोलंदाजांमध्ये श्रीलंकेच्या महिष तिक्षा (६७७ गुण) याचाही समावेश आहे. टी २० फॉरमॅटमध्ये अव्वल १० मध्ये बिश्नोई हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. बिश्नोईशिवाय अक्षर पटेलनही क्रमवारीत ९ स्थानांनी झेप घेतली. तो १८ व्या स्थानी पोहचला आहे.