मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटनमध्ये खेळला जात आहे. न्यूझीलंडने या सामन्यावर पकड निर्माण केली आहे. भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडने २ बाद १०१ अशी सावध सुरूवात केली आहे. पण भारतीय गोलंदाज न्यूझीलंडच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आयसीसीने भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील अंधुक प्रकाशामुळे कमी षटके खेळवण्यात आली. आज सामन्याचा चौथा दिवस असून पावसामुळे अद्याप खेळाला सुरूवात झालेली नाही. पण या सामन्यात न्यूझीलंडचा संघ मजबूत स्थितीत आहे. असे असले तरी भारतीय गोलंदाज टिच्चून मारा करताना पाहायला मिळाले.
आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय वेगवान त्रिकूट मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा न्यूझीलंडच्या फलंदाजांना गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यात काही सुटलेले झेल देखील दिसत आहेत. तसेच काही चेंडू स्टंपच्या अगदी जवळून गेल्याचेही पाहायला मिळत आहेत. आयसीसीने हा व्हिडिओ शेअर करताना, कसोटी सामन्यात यापेक्षा काय थरारक काय असेल? असे म्हटलं आहे.