हैदराबाद:आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ( ICC Women's ODI World Cup ) नुकतीच न्यूझीलंडमध्ये पार पडली. या स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत करुन पटकावले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 71 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया महिला संघाने सातव्यांदा हा किताब आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 357 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 285 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यानंतर आयसीसीने आपल्या वतीने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट 11 खेळाडूंचा संघ निवडला आहे.
अशा परिस्थितीत सर्वात खेदाची बाब म्हणजे आयसीसीने निवडलेल्या या संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. या विश्वचषकात भारतीय संघ तीन विजय आणि चार पराभवांसह पाचव्या क्रमांकावर राहिला. आयसीसीच्या संघात चार ऑस्ट्रेलियन, तीन दक्षिण आफ्रिकेचे, दोन इंग्लंड, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी एक खेळाडू संघात निवडला गेला आहे. या संघाची निवड समालोचक, पत्रकार आणि महिला विश्वचषकात सहभागी असलेल्या आयसीसी पॅनलच्या सदस्यांद्वारे केली जाते.
आयसीसीने निवडलेल्या या संघाच्या कर्णधारपदी विश्वचषक विजेती मेग लॅनिंगची निवड ( Selection of Meg Lanning ) करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने एकही सामना न गमावता विश्वचषक जिंकला आहे. सलामीला चमकदार कामगिरी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची फलंदाज लॉरा वोलवॉर्ट बरोबर उपांत्य आणि अंतिम सामन्यातील चॅम्पियन अॅलिसा हिलीची निवड केली आहे. या संघात कर्णधार मेग लॅनिंगला तिसऱ्या क्रमांकावर आणि स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या रॅचेल हेन्स (509 धावा) चौथ्या क्रमांकावर आहेत.