हैदराबाद ICC Mens U19 World Cup : आयसीसीच्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक आजपासून सुरु होणार आहे. या विश्वचषकाचा हा 15वा हंगाम आहे. यंदाची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाणार आहे. 50 षटकांच्या या स्पर्धेत 16 संघ आमनेसामने असतील. भारत सध्या 19 वर्षाखालील विश्वचषकाचा विजेता आहे. भारतीय संघानं आतापर्यंत 5 वेळा ही स्पर्धा जिंकलीय. त्याखालोखाल ऑस्ट्रेलियानं तीन वेळा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला आहे, तर पाकिस्तानचा संघ दोन वेळा विजेता ठरलाय. ही विश्वचषक स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. आयसीसीनं मोठा निर्णय घेत यावेळी श्रीलंकेऐवजी दक्षिण आफ्रिकेत 19 वर्षाखालील विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका क्रिकेट बोर्डाला निलंबित केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं हे पाऊल उचललंय.
स्पर्धेत 16 संघांचा समावेश : या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 16 संघांना चार गटात ठेवण्यात आलंय. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ 'सुपर सिक्स'मध्ये पोहोचतील. ज्यात 12 संघ दोन पूलमध्ये विभागले जातील. यातील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत खेळतील. हे सामने 6 आणि 8 फेब्रुवारी रोजी होतील. भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला असून, भारतासह बांगलादेश, अमेरिका आणि आयर्लंड हेही संघ या गटात आहेत. ही स्पर्धा 11 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना बेनोनी इथं 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
कोणत्या संघाचा कोणत्या गटात समावेश :
- अ गट: बांगलादेश, भारत, आयर्लंड, अमेरिका
- ब गट: इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज
- क गट: ऑस्ट्रेलिया, नामिबिया, श्रीलंका, झिम्बाब्वे
- ड गट: अफगाणिस्तान, नेपाळ, न्यूझीलंड, पाकिस्तान