आग्रा : आयसीसी क्रिकेट विश्वचषक ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यंदा भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. देशभरातील ९ शहरांमध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन होईल. आता या स्पर्धेच्या प्रचारासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या अंतर्गत विश्वचषकाची ट्रॉफी बुधवारी सकाळी आग्रा येथे पोहोचली. या दरम्यान ताजमहालमध्ये उपस्थित पर्यटकांमध्ये वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटो आणि सेल्फी घेण्यासाठी स्पर्धा लागली होती.
विश्वचषकाचे प्रमोशन सुरू : क्रिकेट विश्वचषकासाठी ५० दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यासाठी सध्या प्रमोशन जोरात सुरू आहे. विश्वचषकाची चमकणारी ट्रॉफी बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ताजमहालमध्ये पोहोचली. ट्रॉफीसोबत ताजमहालचा व्हिडिओ शूट करण्यात आला. यासाठी रॉयल गेटजवळील व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर विश्वचषकाची ट्रॉफी ठेवण्यात आली होती. या दरम्यान ताजमहालमध्ये उपस्थित पर्यटकांच्या नजरा ट्रॉफीवर पडल्या. त्यानंतर तेथे गर्दी जमायला लागली.
ट्रॉफीचे ताजमहालसमोर शूटिंग करण्यात आले : ताजमहालवर आज सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी होती. त्यामुळे ट्रॉफीच्या सुरक्षेसाठी बाउन्सर तैनात करण्यात आले होते. सुमारे तासभर ट्रॉफीचे व्हिडिओ शूटिंग आणि छायाचित्रण करण्यात आले. ट्रॉफीच्या शूटबाबत आयसीसीकडून परवानगी मागितली होती, असे ताजमहालचे वरिष्ठ संवर्धन सहाय्यक प्रिन्स वाजपेयी यांनी सांगितले. ताजमहालमधील फोटोशूट संपल्यानंतर ट्रॉफीसोबत सेल्फी काढण्याची आणि व्हिडिओ बनवण्याची स्पर्धा पर्यटकांमध्ये सुरू झाली. त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मोठ्या कष्टाने बाजूला सारले.