दुबई - आगामी बहुचर्चित आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे ठिकाण आणि तारखांची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने टी-२० विश्वकरंडक यूएई आणि ओमान येथे १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत होणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये टी-२० विश्वकरंडकाच्या तारखेबाबत उत्सुकता होती. आज आयसीसीने याची घोषणा केली.
हेही वाचा -भारतीय महिला क्रिकेटपटू अंशुला राव उत्तेजक चाचणीत दोषी, ४ वर्षांची बंदी
मूळ कार्यक्रमानुसार आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन मागील वर्षी भारतात करण्यात येणार होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती. या वर्षी कोरोनाची स्थिती काहीशी निवळल्यानंतर विश्वकरंडकाचे आयोजन करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू होते. अशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि स्पर्धा पुन्हा पुढे ढकलावी लागली. आता कोरोनाचा प्रकोप कमी झाला आहे. परंतु कोरोनाची तिसरी लाटेचा अंदाज पाहून बीसीसीआयने ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्यासंबंधीचा विचार केला. या प्रकरणी आयसीसीने २८ जूनपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं होते. बीसीसीआयने सोमवारी याबाबतचा निर्णय आयसीसीला कळवला. तेव्हा आज आयसीसीने टी-२० विश्वकरंडकचे स्थान आणि तारखांची घोषणा केली.