नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) यांनी ज्येष्ठ कसोटीपटू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळून भरपूर धावा करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला 2-1 ने मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. ज्यामध्ये रहाणे आणि पुजारा यांना सहा डावांत फक्त एक अर्धशतक झळकावताना केवळ अनुक्रमे 136 आणि 135 धावा करता आल्या होत्या.
रणजी ट्रॉफीची पुनरारंभ (Ranji Trophy Tournament Restart) श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या अगोदर होणार आहे, कारण दोघांवरही कसोटी संघात आपली जागा कायम ठेवण्याचा दबाव आहे. सौरव गांगुली एका मीडिया आउटलेटला रहाणे आणि पुजारा यांच्याबद्दल बोलताना म्हणाले,"हो, ते खूप चांगले खेळाडू आहेत. आशा आहे की, ते रणजी ट्रॉफीमध्ये परत जातील (Pujara-Rahane will return to Ranji Trophy) आणि खूप धावा करतील, जे ते करतील याची मला खात्री आहे. मला वाटते त्यांना कोणतीही अडचण असणार नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप काही केले आहे."
"रणजी करंडक ही एक मोठी स्पर्धा आहे, आणि आम्ही सर्वांनी ही स्पर्धा खेळली आहे. त्यामुळे, ते तिथे परत जाऊन कामगिरी करतील. त्यांनी भूतकाळात स्पर्धा खेळल्या आहेत जेव्हा ते फक्त कसोटी क्रिकेट खेळत होते आणि एकदिवसीय किंवा टी-20 संघाचा भाग नव्हते. त्यामुळे, त्यांना कोणतीही अडचण येणार नाही," असे भारताचा माजी कर्णधार गांगुली म्हणाला.