हैदराबाद History of ODI Cricket : आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 5 जानेवारीच्या दिवसाला विशेष स्थान आहे. पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना (ODI) आज (5 जानेवारी 1971) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) खेळला गेला होता. सध्या एकदिवसीय सामने 50-50 षटकांचे असले तरी हा पहिला एकदिवसीय सामना 40-40 षटकांचा होता. या प्रकारचा पहिला सामना ऑस्ट्रेलियानं जिंकला होता आणि 82 धावा करणाऱ्या इंग्लंडच्या जॉन एडरिचनं एकदिवसीय इतिहासातील पहिला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार पटकावलाय. या सामन्यात नाणेफेक हरल्यावर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 39.4 षटकांत (8 चेंडूंचं 1 षटक) 190 धावांवर सर्वबाद झाला. तर ऑस्ट्रेलियानं 42 चेंडू बाकी असताना 5 विकेट्स गमावून विजयाचं लक्ष्य गाठलं होतं.
कशी झाली एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात : एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात होण्याची कहाणी खूप मजेशीर आहे. इंग्लंडचा संघ 7 सामन्यांच्या अॅशेस मालिकेसाठी नोव्हेंबर 1970 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. या मालिकेतील पहिला आणि दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेन आणि पर्थ इथं झाला. हे दोन्ही सामने अनिर्णित राहिले. तिसरा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (31 डिसेंबर 1970 ते 5 जानेवारी 1971) होणार होता. पण पावसामुळं सामना सुरू झाला नाही. त्यावेळी 6 दिवसांचा कसोटी सामना असायचा, त्यात एक दिवस 'विश्रांतीचा दिवस' असायचा. अशा स्थितीत सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाऊस थांबला तेव्हा दोन्ही संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी सज्ज झाले आणि त्यामुळं क्रिकेटचा नवा प्रकार उदयास आला. विशेष म्हणजे मेलबर्नच्या स्थानिक लोकांचे मनोरंजन आणि खेळाडूंचा आर्थिक फायदा लक्षात घेऊन दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांचा सामना खेळवण्यात येईल, असा निर्णय दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी घेतला. हा सामना पाहण्यासाठी त्या मैदानावर 46 हजार प्रेक्षक जमले होते.
पहिल्या एकदिवसीय सामन्याची वैशिष्ट्ये :
- पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, गोलंदाज एका षटकात 8 चेंडू टाकायचा.
- टॉम ब्रूक्स आणि लू रोवेन यांनी क्रिकेट इतिहासातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अंपायरची भूमिका बजावली.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये, इंग्लंडच्या जेफ्री बॉयकॉटनं पहिल्या चेंडूचा सामना केला आणि तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाद होणारा पहिला फलंदाज देखील होता.
- एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाचा अॅलन थॉमसन हा पहिलं षटक टाकणारा गोलंदाज होता.