मुंबई - हर्षा भोगले हे समालोचन क्षेत्रातील नावाजलेलं नाव आहे. परंतु ते भारत आणि न्यूझीलंड या संघात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात समालोचन करणार नाहीत. याचं कारण खुद्द त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे.
हर्षा भोगले यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं की, 'जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मी या आठवड्यामध्ये साउथम्पटनला उपलब्ध राहणार होतो. परंतु क्वारंटाईनच्या नियमांमुळे, मला एका सामन्यासाठी २७ ते २८ दिवस घरापासून दूर राहावे लागणार होतं. मी बायो बबलमध्ये भरपूर वेळ घालवला आहे. पुढेही भरपूर वेळ घालवायचा आहे. पण सध्या मी घरीच ठीक आहे. यामुळे मला माघार घ्यावी लागली.'
दरम्यान, आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लिश भाषेसाठी समालोचकांची यादी जाहीर केली आहे. यात सुनिल गावसकर आणि इयान बिशप सारख्या दिग्गज समालोचकाचा समावेश आहे. गावसकर आणि बिशप यांच्यासोबत कुमार संगकारा, नासीर हुसेन, सायमन डूल, ईशा गुहा, माईकल आथर्टन, क्रेग मॅकमिल आणि दिनेश कार्तिक हे देखील अंतिम सामन्यात समालोचन करणार आहेत.