मुंबई Hardik Pandya :हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला आहे. मुंबईनं गुजरात टायटन्ससोबत ट्रेडच्या माध्यमातून हार्दिकला आपल्या संघात शामील केलं. आता आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक मुंबईच्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
संपूर्ण कॅश डील झाली :रिपोर्टनुसार, मुंबईनं हार्दिक पांड्याला आयपीएल २०२४ साठी आपल्या संघात समाविष्ट केलं. ही संपूर्ण कॅश डील आहे, म्हणजेच गुजरातनं या डीलमध्ये मुंबई इंडियन्सकडून एकही बदली खेळाडू घेतला नाही. मात्र याबाबत दोन्ही फ्रेंचाईजीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गुजरातमध्ये जाण्यापूर्वी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा भाग होता. मुंबईकडूनच त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.
हार्दिकची आयपीएल फी १५ कोटी रुपये : बीसीसीआय आणि आयपीएलच्या सूत्रांनुसार, या ट्रेडसाठी औपचारिक मान्यता देण्यात आली. मात्र ट्रेडचं मूल्य किती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ३० वर्षीय हार्दिकची आयपीएल फी वर्षाला १५ कोटी रुपये आहे. २०२४ मध्ये रोहित शर्माचं मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे, मुंबईनं स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघाबाहेरचा रस्ता दाखवला. त्याला रिटेन करण्यात आलेलं नाही. याशिवाय रिपोर्टनुसार, कॅमरून ग्रीनला आरसीबीसोबत ट्रेड करण्यात आलंय.
पहिल्या सीझनमध्ये गुजरातला चॅम्पियन बनवलं : २०२२ मध्ये आयपीएलमध्ये नव्यानं आलेल्या गुजरात टायटन्सनं त्याला खरेदी केलं होतं. विशेष म्हणजे, आपल्या पहिल्याच हंगामात संघाचं नेतृत्व करताना त्यानं गुरातला चॅम्पियन बनवलं. यानंतर आयपीएल २०२३ मध्ये हा संघ उपविजेता राहिला होता. अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं शेवटच्या चेंडूवर त्यांचा पराभव केला. तर मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२२ चा हंगाम खूपच खराब राहिला. संघाला १४ पैकी फक्त ४ सामन्यात विजय मिळवता आला. ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राहिले.
हेही वाचा :
- धोनी आयपीएल २०२४ खेळणार! बेन स्टोक्सचा होणार लिलाव; जाणून घ्या संपूर्ण यादी