मुंबई Rohit Sharma : मुंबई इंडियन्सनं आयपीएल २०२४ साठी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं. संघानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली. यासह रोहित शर्माच्या कर्णधार म्हणून १० वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला. मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून रोहित शर्माचं आभार व्यक्त केलं आहे.
मुंबई इंडियन्सची भावनिक पोस्ट : मुंबई इंडियन्सनं सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, "रोहित तू २०१३ मध्ये कर्णधार झालास. तू आम्हाला विश्वास ठेवायला शिकवलं. विजय आणि पराभवातही तू आम्हाला हसत राहायला सांगायचा. तू आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची उर्जा दिली. तू १० वर्षात ६ ट्रॉफी जिंकल्या. तुझा वारसा नेहमीच कायम राहील. तू कायमच आमचा कर्णधार राहशील. थॅन्क्यू कॅप्टन रोहित शर्मा", असं या पोस्टमध्ये म्हटलंय.
टीमचा कायापालट केला : रोहित शर्मा २४ एप्रिल २०१३ ला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनला होता. सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिग यांसारख्य दिग्गज खेळाडूंनी सजलेली ही टीम त्यापूर्वी एकदाही विजेतेपदावर नाव कोरू शकली नव्हती. मात्र रोहितनं कर्णधार बनताच टीमचा कायापालट केला. त्याच्या नेतृत्वात मुंबईनं २०१३ मध्ये आपलं पहिलं आयपीएल विजेतेपद पटकावलं. त्यानंतर २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये टीम चॅम्पियन बनली.