मुंबई : 'क्रिकेटचा मक्का' म्हटल्या जाणार्या लॉर्ड्सवर भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण. सुरुवात इतकी चांगली झाली की पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर पुढच्या कसोटीतही त्याने शतक झळकावले. पुढे कर्णधारपद मिळाल्यावर त्याने देशाला जिंकण्याची सवय लावली. त्याची अशी 'दादागिरी' पाहून अवघे क्रिकेट जगत थक्क झाले. होय! 'प्रिन्स ऑफ कोलकाता', 'बंगाल टायगर', 'गॉड ऑफ द ऑफ साइड' अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीबद्दल आम्ही बोलत आहोत. भारतीय चाहत्यांचा लाडका 'दादा' आज (8 जुलै) 51 वर्षांचा झाला आहे.
संघाला लढायला आणि जिंकायला शिकवले : 'दादा'च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवी उंची गाठली. गांगुलीने वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, युवराज सिंग यांसारख्या स्टार क्रिकेटपटूंच्या करिअरला घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. महेंद्रसिंह धोनीनेही गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केले. गांगुली हा असा कर्णधार म्हणून स्मरणात राहील ज्याने आपल्या संघाला लढायला आणि जिंकायला शिकवले.
गांगुलीची 'दादागिरी' : गांगुलीच्या 'दादागिरी'चे किस्से आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. 13 जुलै 2002 रोजी इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग यांच्या जादुई खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करून नेटवेस्ट मालिकेवर कब्जा केला. त्यानंतर लॉर्ड्सच्या बाल्कनीत गांगुलीने आपला टी-शर्ट काढून अशा प्रकारे सेलिब्रेशन केले की ही घटना इतिहासाच्या पानांमध्ये नोंदली गेली.