नवी दिल्ली Gautam Gambhir : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं २०२४ मध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भविष्यवाणी केली आहे. या स्पर्धेत कोणती टीम भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकते, हे त्यानं सांगितलं. गंभीरनं ज्या संघाचं नाव घेतलं ते जाणून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. एका कंपनीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गंभीर याबद्दल बोलताना दिसत आहे.
काय म्हणाला गंभीर : गौतम गंभीरला एक प्रश्न विचारण्यात आला होता की, तुमच्या मते २०२४ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत कोणता संघ भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. यावर गंभीरनं जे उत्तर दिलं, ते ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. या प्रश्नाला उत्तर देताना गंभीरनं अफगाणिस्तानच्या टीमचं नाव घेतलं. 'अफगाणिस्तानची टीम भारतासाठी मोठा धोका बनू शकते, असं तो म्हणाला. मला वाटतं की, अफगाणिस्तानचा संघ २०२४ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी मोठा धोका ठरू शकतो. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या परिस्थितीत अफगाणिस्तान खूप धोकादायक असेल. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड देखील भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. ऑस्ट्रेलियाकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत तर इंग्लंड टी २० क्रिकेट ज्या पद्धतीनं खेळलं पाहिजे तसं खेळतात, असं गंभीर म्हणाला.