नवी दिल्ली Gambhir on Dhoni : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया कप सुपर ४ सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो भारताचा सहावा आणि जगातील १५ वा फलंदाज ठरला आहे. दरम्यान, रोहित शर्मानं सलामी फलंदाज म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८,००० धावाही पूर्ण केल्या.
गंभीरनं केलं धोनीचं कौतुक : या सामन्यादरम्यान, स्टार स्पोर्ट्सवरील एका शोमध्ये भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरनं माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीबद्दल एक मोठं वक्तव्य केलं. गंभीर तसा धोनीवर टीका करण्यासाठी ओळखला जातो. त्यानं अनेकदा धोनीची कठोर शब्दात आलोचना केली आहे. यामुळे तो धोनीच्या चाहत्यांकडून ट्रोल देखील झाला आहे. यावेळी मात्र उलट घडलं. या सामन्यादरम्यान गौतम गंभीरनं चक्क धोनीचं कौतुक केलं आहे.
- रोहितच्या यशाचं श्रेय धोनीला दिलं : गौतम गंभीरनं रोहित शर्माच्या यशाचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला दिलं आहे. 'रोहित शर्मा आज जो कोणी आहे, तो एमएस धोनीमुळे आहे. धोनीनं रोहितला त्याच्या सुरुवातीच्या संघर्षात सतत साथ दिली, असं गंभीर म्हणाला. रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात वनडेत दहा हजार धावा पूर्ण केल्या. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर गौतम गंभीरनं हे उत्तर दिलं.