ढाका - न्यूझीलंड क्रिकेट संघाचा फलंदाज फिन एलन बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्या टी-20 मालिका खेळली जाणार आहे. फिन एलन या मालिकेसाठी बांगलादेशला पोहोचला होता. तेव्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे. दरम्यान, त्याने 'द हंड्रेड' स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने बर्मिंघम फिनिक्स संघाचे प्रतिनिधित्व केले.
विशेष म्हणजे फिन एलन याने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. याशिवाय प्रवासाआधी त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. ढाकामध्ये पोहोचल्यानंतर 48 तासांनी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.
फिन एलनला एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे. बांगलादेश क्रिकेट संघाचे वैद्यकीय टीम त्याच्यावर उपचार करत आहे. तसेच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाची वैद्यकीय टीम देखील त्यांच्या संपर्कात आहे.