मुंबई: इंडियन प्रीमियर लीग 2022 चा 52 वा सामना शनिवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Rajasthan Royals vs Punjab Kings ) संघात पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 189 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने हे लक्ष्य महिनाभरानंतर पुनरागमन करत असलेल्या, यशस्वी जैस्वालच्या ( Batsman Yashaswi Jaiswal ) जोरावर 19.4 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या सामन्यात यशस्वीने अवघ्या 41 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने यशस्वी जैस्वालबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
माजी दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ( Former cricketer Virender Sehwag ) राजस्थान रॉयल्सचा (आरआर) युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या धुवांधार खेळीवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यशस्वी जैस्वालला काही दिवसापूर्वी संघातील आपले स्थान गमवावे लागले होते. विशेष म्हणजे त्याला आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी राजस्थान संघात रिटेन करण्यात आले होते. तरी ही त्याच्या जागी दुसरा खेळाडू खेळत आहे, हे पाहून तो दुखावला असावा, असे वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. जेव्हा खेळाडूच्या मनाला एखादी गोष्ट लागते, तेव्हा तो नक्कीच चांगली कामगिरी करतो.
पंजाब किंग्जविरुद्धच्या ( Punjab Kings ) सामन्यात यशस्वी जैस्वालने अनेक सामन्यांनंतर पुनरागमन केले आणि त्याने जबरदस्त खेळी करत संघाला सामना जिंकून दिला. यशस्वीने अवघ्या 41 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने एका टोकापासून संघाचा डाव सांभाळून धरला होता.