कराची - पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नूतन अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. रमीज राजा पुढील तीन वर्षे पीसीबीचे अध्यक्ष राहतील. पीसीबी निवडणूक आयुक्त न्यायाधिश (निवृत्त) अजमत सईद यांच्या अध्यक्षेत पार पडलेल्या बोर्डाच्या बैठकीत रमीज राजा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान, रमीज पीसीबीचे 36वे अध्यक्ष आहेत.
अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर रमीज राजा यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, मला या पदासाठी निवडण्यात आले, यामुळे सर्वांचे आभार मानतो. मी सगळ्यांसोबत मिळून पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगले काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. आशा आहे की, आपल्या सगळ्याच्या माध्यमातून पाकिस्तान क्रिकेट, मैदानाच्या आत आणि मैदानाबाहेर अधिक बळकट होईल.
एक संघटना म्हणून आमचे काम आहे की, आम्ही संघाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू. यासोबत त्यांना प्रत्येक आवश्यक ती सुविधा आणि पाठबळ देऊ. ज्यामुळे ते चाहत्यांच्या आपेक्षेप्रमाणे क्रिकेट खेळू शकतील, असे देखील रमीज यांनी सांगितलं.
जगभरात पाकिस्तान संघ निडर खेळासाठी ओळखला जात होता. तशी ओळख पुन्हा मिळवण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असेही रमीज यांनी सांगितलं.