कोलकाता - भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांची पश्चिम बंगाल सरकारमध्ये क्रीडामंत्री म्हणून वर्णी लागली आहे. सोमवारी ममता बॅनर्जी यांनी आपल्या मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यात तृणमूल काँग्रेसच्या ४३ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी माजी खेळाडू मनोज तिवारी यांना हावडा जिल्ह्यातील शिवपूर मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. या निवडणूकीत तिवारी यांनी ३२ हजार मतांनी विजय मिळवला. आता आमदार झाल्यानंतर त्यांची थेट निवड राज्यमंत्री म्हणून करण्यात आली आहे.
सोमवारी झालेल्या शपथविधीत मनोज तिवारी यांनी ममता बॅनर्जी सरकारमध्ये क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एका खेळाडूकडे क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी मिळाल्याने राज्यातील खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.