कोलकाता - न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा टी-20 सामना आज कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. भारताने पहिले दोन टी-20 सामने जिंकून मालिका आपल्या खिशात घातली असली तरी अखेरचा सामना जिंकत मालिका 3-0 ने जिंकायच्या प्रयत्नात असेल. दरम्यान, शेवटच्या सामन्यात नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मालिका ३-० ने जिंकण्याची संधी -
जयपूर आणि रांचीमध्ये विजय मिळवून भारतीय संघाने मालिका खिशात घातली आहे. पूर्णवेळ टी-20 कर्णधार म्हणून रोहितची ही पहिलीच मालिका आहे. ज्यात त्याने दोन्ही सामन्यात नाणेफेक जिंकली. त्यामुळे परिस्थितीचा फायदा उठवण्यास मदत झाली आणि गोलंदाज आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. रोहितने ईडन गार्डन्सवरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये २६४ धावा केल्या होत्या आणि कर्णधार म्हणून येथे पहिली मालिका ३-० ने जिंकणे त्याच्यासाठी महत्त्वाचे असेल. त्यानंतर आठवडाभरात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होणार आहे.
राखीव खेळाडूंचा होऊ शकतो समावेश -
दरम्यान, आज होणाऱ्या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार रुतुराज गायकवाड, आवेश खान आणि इशान किशन यांना या सामन्यात संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवलेला गायकवाड पहिल्या तीनपैकी कोणत्याही ठिकाणी फलंदाजी करू शकतो. यासाठी कर्णधार रोहित किंवा उपकर्णधार केएल राहुल यांना बाहेर बसावे लागेल. राहुलला चार दिवसांनंतर कसोटी मालिका खेळायची असल्याने त्याला वगळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दीपक चहर किंवा भुवनेश्वर कुमारच्या जागी आवेश खानला मैदानात उतरवले जाऊ शकते. अक्षर पटेल किंवा रविचंद्रन अश्विनच्या जागी युजवेंद्र चहल सुद्धा खेळण्याची शक्यता आहे. तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून सतत खेळणाऱ्या ऋषभ पंतच्या जागी इशान किशनला संधी दिली जाऊ शकते.
असे असतील संघ -
- भारत :रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज
- न्यूझीलंड : टीम साऊदी (कर्णधार), टॉड अॅस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोधी
- सामन्याची वेळ :सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.
हेही वाचा - मिस्टर 360 : एबी डिव्हिलियर्सची IPL मधून निवृत्ती